व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती

व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती

आता जवळ व्हॅलेंटाईन डे आलाय, ज्यांचं जुळलंय त्याना समुद्राइतका आनंद झाला असेल आणि ज्यांचं जुळण्याच्या मार्गावर आहे ते डबल तयारी करत असतील एक म्हणजे कधी हो म्हणेल याची आणि दुसरी म्हणजे हो म्हणलीच तर पुढचं डे सेलिब्रेशन! प्रेम या निथळ भावनेचा अक्षरशः बाजार मांडलाय या लोकांनी, सगळं काही बाजारभावाप्रमाणे, ते असतं ना रोज भाव खाली वर होतात तसंच यांचेही भाव खालीवर होतात जर का असणारी व्यक्ती कमी जास्त काय केली तर ऑपशन ठेवतात हे लोक कारण हृदय विकणाऱ्यांची संख्या पण फार कमी नाही खूपच कमी रेट! पण थोडा मी म्हणते अगदी थोडा जरी गंभीरपणे विचार केला तर आणि तरच प्रेम काय असतं तर समजेल .

नात्याची परिभाषा प्रेम आहे, आईशी नातं असतं तिला जेंव्हा आपली तिच्या उदरात चाहूल लागते तेंव्हा पासून. या पवित्र नात्याचा आदर्श ठेवत जर आपण सध्याच्या प्रेमाच्या नात्याची रेखा आखायची म्हणली तर काय होईल ? जवळपास ते अशक्यच आहे पण घडण्याची आशा नक्कीच आहे जर मनात आणलं तरच. पाहता क्षणी, निस्वार्थपणे, मागे पुढे न विचार करता मनात एक कवडसा डोकावतो ते असतं प्रेम. प्रेमाचं दुसरं नाव शौर्य, कारण प्रेमाईतकी ताकद दुसऱ्या कशातच नसते अस म्हणतात, म्हणून तर आई आणि लेकराचं नात अतूट असत, निस्सीम असतं व तकलादू नसतं . प्रेम ही वाईट भावना अजिबात नाही तर ती एक स्वच्छ,पवित्र भावना आहे पण सध्या त्याचा उहापोह फारच वाढलाय कदाचित त्यामुळे नाती तात्पुरती बनलीयत त्यामुळे ती तोडताना फारसा त्रास होत नाही .

असो! आपण आता बोलणार आहोत ते नात्यांच्या सौंदर्याबद्दल ! तुम्ही म्हणाल सौंदर्य शरीराचं, वास्तूचं, प्राण्यांचं आणि नैसर्गिक गोष्टींचं असतं पण इथे तुम्ही अलगदपणे अनुभवाल ‘सौंदर्य नात्यातलं ‘ . जसं हे शरीर सजवलं जातं आकर्षक दागिने अलंकृत करून तसंच काही असेही अलंकार आहेत ज्यांचा वापर करून नात्याचं सौंदर्य खुलवू शकतो . मनाची निर्मलता अनब्लॉक केली की ते सौंदर्य आपोआप खुलतं. अस म्हणतात की शांत डोक्याने विचार केल्यास निर्णय कधी चुकत नाही अगदी तेच जर आपण नात्यात लागू केलं तर वाद होणारचं नाहीत आणि झालेच तर ताणनार नाहीत. अशाच काही गोष्टी आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं नातं बहरून येईल आणि तुम्ही आनंदाने थुई-थुई नाचाल !

विश्वास

विश्वास हा नात्याचा पाया असतो जो भक्कम असेल तर आणि तरंच नात्याची इमारत भक्कम उभा राहू शकते . विश्वास जिंकण, तो मिळवणं हे काही सोपं काम नसतं त्यासाठी ठाम रहावं लागतं आणि इथेच माणसं चुकतात आणि नात्याची रांगोळी मग विस्कटते. उच्चतम् काळजी कोणत्या गोष्टीची घ्यायची झाली तर ती म्हणजे विश्वास संपादन करून तो अबाधित राखणं ही आहे .

गुण-अवगुण

आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारता येनं हा सुद्धा अंगातील एक चांगला गुण आहे ज्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता असते. सामावून घेणं म्हणजे त्या माणसाच्या गुणदोषांसकट स्वीकारणं . तिचे दोष तुम्ही आणि तुमचे तिने असं करत हा वाद खूप पुढ जातो आणि त्याचा पाढा बनतो जो ते लोकं वाचून दाखवायलाही मागे पुढं बघत नाहीत ! हे जेंव्हा नात्यात घडून येईल तेंव्हा नक्कीच नात्यात सौंदर्य येईल !

वेळ

वेळ आपण कामाची पाळतो पण काम करून ते कष्ट सार्थकी जिथं लावतो ‘ त्या ‘साठी आपण वेळ पाळतो का ? म्हणजे आपल कुटुंब जिथं आपण राहतो त्या माणसांनाही तुमचा वेळ द्याकी जेणेकरून दोन्हीकडेही समाधान गवसेल. भांडणाचं हे एक कारण प्रकर्षाने समोर येतं की एकमेकांना एकमेकांसाठी वेळ नसतो अरे मग तुम्ही समजूनच कधी घेणार एकमेकांना ? म्हणून नात्यातला वेळ ठरलेलाच हवा , नाहीतर वेळेला नातं धावून येणार नाही !”

आडमुठेपणा

आजकाल प्रेमात पडल्यावर किंवा लग्न ठरल्यावर सांगायची जणू ‘ फॅशनचं ‘ झालीय ,तेपण बळीचा बकरा झाल्यावर ! ! ! “मुलगी थोडी हट्टी आहे बरं !” यामधील थोडी हा शब्द साफ खोटा असतो तर हट्टी हा शब्द १०० % अचूक असतो ,अहो हट्ट कसला तो असतो ” आडमुठेपणा ” ! हट्ट तर लहान लेकरं करतात पण इथं माझाच तोरा मिरवणं व माझंच खरं म्हणून नवऱ्याचा नंदी करणं यात कुठलं आलंय नातं ! तेव्हा तुम्ही हे समजून जा की तुम्ही आडमुठेपणाशी लग्न केलंय ! म्हणून एकमेकांना समजून घेऊन हेकेखोरपणे न वागता आयुष्य जगण्यातलं समाधान म्हणजेच नात्यातली सुंदरता !

राग

गाण्यातला ‘ राग ‘ एक सुंदर गीत गाऊ शकतो ,अभंग गाऊ शकतो मग नात्यातला ‘ राग ‘ का बरं वेगळ वळण घेतो ? याचा कधी विचार केलाय का ? राग हा येतोच मुळी हक्काच्या माणसांवर ! आणि म्हणलं तसं गाण्यातला राग आणि हा थोडक्यात साम्य असणारा आहे म्हणजे असं की राग जेंव्हा येतो तेव्हा बिनधास्त तो व्यक्त करावा पण पण पण त्यानंतर बाकी मात्र ‘ शून्यच ‘ रहायला हवी , जसं पाणी वाहतं असतं कचरा मागे ठेऊन ! अशीच नात्यातली सुंदरता राग जेव्हा येईल तेव्हा व्यक्त करून पूर्ववत निर्मल नातं कंन्टिन्यू करायचं .

संशयाची स्पर्शिका

नातं तुटतं ते याचं कारणामुळे : नात्याला जर ही स्पर्शिका छेदून गेली तर नातं पोकळ बनतं आणि नात्याला वाळवी लागते आणि ती वाळवी ते नातं तकलादू घोषित करून शेवटी संपवते ,म्हणून ” नात्यातली वीण घट्ट करण्यासाठी तिला संवादाचं खत-पाणी घाला, गैरसमजुतीची कीड सामंजस्याच कीटकनाशक वापरून संपवा मग बघा नातं किती बहरतं ते …”

भूमिका

जीवन हीच एक रंगभूमी आहे आणि तिथं डोलणाऱ्या आपण साऱ्या कठपुतल्याचं ! प्रत्येकजण एक भूमिका साकारतो कुणी सावरण्याची तर कुणी आवरण्याची. पण भूमिका इतकी गाजली पाहिजे की टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत ,रंगमंच जिवंत वाटला पाहिजे. नात्यातली भूमिका सुखावेल की दुखावेल हा ज्यांन-त्यानं विचार केला पाहिजे जिथे दया ,प्रेम ,क्षमा हे शब्द नाही तर भाव जागे झाले पाहिजेत प्रत्यक्षात ! प्रत्येकवेळी टोकाची भूमिका घेणं अयोग्य ठरेल पण नेहमीच नमती भूमिका घेणं तेही वावंगच ठरेल ,यातला सुवर्णमध्य असा की संवादाला निमंत्रण द्या आणि आपल्या माणसाशी गुजगोष्टी करा ती असेल खरी भूमिका या जीवनाच्या रंगमंचावर सजेल अशी आणि बनेल नातं सुंदर!

स्वार्थ

प्रेमात माणसानं इतकी स्वार्थी बनाव की समोरच्यान कितीही जमवलं तरी त्याला तुमच्यासारखं प्रेम करता नाही आलं पाहिजे ,स्वार्थी असावं माणसानं त्याच्या आयुष्यात ,कारण जगायला काय लागतं हे ज्याला त्याला वेगळं ठाऊक असतं . स्वार्थ हा असणं स्वाभाविक आहे म्हणून त्याला मर्यादा नाही असं नाहीय ,तितकाच स्वार्थ जितकी मर्यादा .नात्यातलं सुंदर फुल तेंव्हाच बहरेल जेव्हा स्वतःशी स्वार्थी बनून सोबतीला साथ द्याल.

हा निबंध आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपल्या मित्रांमध्ये शेयर करा.

Rate this post

SwaRani

लिहण्याचा माझा छंद, जसा फुलातील मकरंद, लेखणीतून माझ्या उतरवते शब्दसुगंध !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *