मनुष्य हा रंगमय विश्वात वस्ती करून राहिला आहे. त्याच्या आयुष्यात रंगांचे महत्त्व इतके जास्त आहे की, त्याच्या भावना आणि रंग या एकमेकात समरस होऊन गेल्या आहेत. प्रत्येक रंगाशी आपली एक स्वतंत्र भावना जोडली गेली आहे.पहा ना, सहज आपले डोळे एखादा रंग अथवा रंगांमध्ये घडलेली एखादी सुंदर कलाकृती पाहतात आणि क्षणात आपल्या मनाला त्याची भुरळ पडते. मनात एक शांततेची लहर उत्पन्न होते आणि न वर्णू शकणारा आनंद आपल्याला जाणवतो. मानसशास्त्र अस सांगत की अश्याच सुंदर गोष्टी माणसाच्या अंतर्मनावर कोरल्या जातात आणि त्यामुळेच मानवी आयुष्य समृद्ध होत जातं.
प्रत्येक रंग हा एका विशेष भावनेचं प्रतीक असतो याबद्दलच ज्ञान आपल्याला ज्येष्ठांकडून मिळत असतं.जस की पिवळा रंग आनंद व सुखवृद्धी आणणारा असून तो मेंदूला तरतरी आणतो.पिवळा रंग हा श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय रंग आहे. त्यांनी नेसलेलं पितांबर म्हणजे पिवळं रेशमी वस्त्रच होय.त्यामुळे पिवळ्या रंगाला अध्यात्मिक आणि शुभ मानले जाते.अशाच प्रकारे पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो.भारतीय ध्वजामध्ये असणारे आणखी दोन रंग म्हणजे केशरी आणि हिरवा. यापैकी केशरी हा त्याग शौर्य आणि बलिदान याचे प्रतीक आहे तर हिरवा रंग संपन्नता आणि समृद्धी याचे प्रतीक मानला जातो.असे प्रत्येक रंग व त्याचे विशिष्ट महत्व आहे.
आपल्या आयुष्यात रंग नसते तर आयुष्य किती निरस आणि उदासीन होऊन गेलं असतं. मीठ नसलेल्या बेचव जेवणा सारखी आपली अवस्था झाली असती. आता इतके अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या रंगांचा एखादा उत्सव तर असायलाच पाहिजे आणि तो म्हणजे रंगपंचमी.
स्वच्छ निळ आकाश आणि प्रखर उन्हामध्ये तेजस्वी रंगांची मुक्त उधळण करून आपण हा रंगांचा उत्सव साजरा करतो. आपल्या आयुष्यात त्यांचं महत्त्व आणि अस्तित्व कायम टिकून राहावे म्हणून आपण एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करतो.या उत्सवात आनंद लुटण्यासाठी वयाची कोणतीच अशी मर्यादा नाही.लहान आणि मोठे सर्वजण मनसोक्त पणे रंगपंचमी मध्ये सहभागी होतात.
दरवर्षी असे उत्सव साजरे करताना जुन्या आठवणी सुद्धा तजेलदार होतात.लहानपणी रंगपंचमी खेळताना रंगांच्या खरेदीसाठी वर्गणी गोळा करणे,पाण्याचे हौद भरून ठेवणे,वेगवेगळ्या पिचकाऱ्या आणि खेळणी खरेदी करणे या गोष्टींसाठी वेळ पुरायचा नाही.दिवसभर जरी रंगात खेळलो तरी मन कधीच भरायच नाही.
प्रत्येक ठिकाणी सण एक असला तरी प्रथा वेगवेगळ्या असतात.आमच्या गावात सुद्धा रंगपंचमीला एक प्रथा प्रचलीत आहे.दिवसभर रंग खेळून झाल्यानंतर गावातील सर्व लहान – मोठी मुले गावातल्या प्रत्येक घरी जाऊन तांदूळ, डाळ,मसाले असे जेवणासाठी चे सर्व साहित्य गोळा करतात आणि ते सर्व घेऊन शेतात जातात.त्या ठिकाणी चुलीवर हे अन्न शिजवले जाते.त्या अन्नाचा पहिला नैवद्य ते अन्न ज्या जमिनीतून प्राप्त झालं त्या जमिनीला अर्पण केला जातो. यानंतर अग्नी,पाणी आणि ग्रामदैवत यांना अर्पण केला जातो. यानंतर सर्वजण मिळून भोजन करतात.लोकांचं अस मानन आहे की अश्या प्रथांमुळे निसर्गाची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि त्याच्या कलेतील सुरेख रंग तो आपल्यावर बरसत राहतो.किती सुंदर विचार आहे पाहा ना..! मला अश्या प्रथांमध्ये माणसाची श्रद्धा दिसून येते जी माणसाच्या आयुष्याला सदैव प्रेरणा देणारी असते. या माध्यमातून निसर्गाला कृतज्ञता व्यक्त केली जाते.निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे आभार मानले जातात. याचबरोबर यातून लोकांमध्ये ऐक्य आणि चैतन्य टिकून राहते. हे उत्सव आणि परंपरा आपले जीवन कश्या प्रकारे समृध्द बनवत जातात याची जाणीव होते.
पण आजकाल आपलं बदलतं राहणीमान आणि गावांचं वाढत चाललेलं शहरीकरण या गोष्टींच्या आड येत आहे.गाव आणि गावातील रुढी परंपरा यांचा लोकांना विसर पडू लागला आहे.पाश्च्यात्य संस्कृतीच अनुकरण करण्यात लोकांना हेवा वाटत आहे.यामुळे निसर्गप्रेम आणि त्याची कर्तव्ये आपण विसरून जात आहोत.यातूनच रंगपंचमीला निसर्गिक रंग न वापरता रासायनिक रंगांचा वापर,मोठमोठ्याने आवाज करणारे फटाके,पाण्याचा अतिरेक, डीजे अश्या प्रकारच्या विकृतींमुळे आपल्या सण उत्सवांना गालबोट लागते आणि पुढच्या पिढीपर्यंत चुकीचा संदेश पोहचतो.नैसर्गिक साधनांचा चुकीचा वापर वा अतिरेक हा घातकच ठरतो आणि यामुळे त्सुनामी,भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ अशा आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागते.सध्या सर्वांवर आलेलं कोरोना महामारीच संकट सुद्धा यातीलच एक भाग आहे.त्यामुळे आपल्याला जर मानवी आयुष्यात समतोल राखायचा असेल तर निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणं गरजेचं आहे.
निसर्ग हा उपजतच कलाकार आहे.त्याच्यापासून लाभलेल्या प्रत्येक गोष्टी पासून आपण आपल्या आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतो आहोत.आपण धर्म,जात,समाज या नावाखाली वेगळे असलो तरी आपल्यातील मानवता आपल्याला एकत्र बांधून ठेवते.प्रत्येकाच्या धर्मानुसार विविध परंपरा,प्रथा,संस्कृती यांचं विभाजन झाल आहे.त्यांचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्व देखील आहे. आपल्या आयुष्यात कामाच्या व्यस्त वेळेतून थोडासा वेळ आपल्या प्रियजनां सोबत व्यतित करण्यासाठी आणि आपले स्नेहबंध टिकवण्यासाठी या सण,उत्सव,परंपरा यांचा पाया रचला आहे.आपल्याला या गोष्टींचा सार्थ अभिमान असला पाहिजे आणि या गोष्टींचा पुरस्कार करून आपण त्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत सुपूर्त केल्या पाहिजेत.
हा निबंध आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपल्या मित्रांमध्ये शेयर करा.
इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :
१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)
२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)
३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)
४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)