मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

मराठी भाषण कसे करावे? – असं म्हणतात कि, “कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सुविचार, उच्चार, आचार, प्रचार हे प्रभावी वक्ता होण्यासाठी आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच तर वक्त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचत असते. वक्त्याला त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून, आवाजावरून, आणि बोलण्याच्या कौशल्यावरूनच ओळखले जाते. राजकारणी असो कि शिक्षक असो, आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाषण हा सर्वोत्तम मार्ग आहे. ह्या पोस्टमध्ये आपण योग्य रित्या मराठी भाषण कसे करावे? हे आज आपण पहाणार आहोत..

मराठी भाषण कसे करावे?

भाषण करण्यासाठी लागतो आत्मविश्वास, ज्ञान. या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सभा गाजवणारच यात तिळमात्रही शंका घेता येणार नाही. मराठी भाषण कसे करावे हा प्रश्न सर्व-सामान्यांना नेहमीच पडतो. जेव्हा त्यांना इतरांसमोर आपले विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा खरी तारांबळ उडते. “वक्ता दशसहस्त्रेषु” असे जरी म्हणले जात असले तरी, एक उत्तम वक्ता होणे हि काळाची गरज आहे म्हणूनच या लेखात आपण मराठी भाषण कसे करावे? भाषणाची सुरुवात कशी करावी? भाषण देताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे? प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करावे लागते? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उकल करणार आहोत. चला तर मग लेख पूर्ण वाचूया!

भाषणाची सुरुवात कशी करावी?

१. आत्मविश्वास निर्माण करणे :

भाषण करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय तुम्ही तुमचे पाऊल पुढे टाकूच शकत नाही. साधा भाषणाचा विचार करायचा म्हणलं तरी मनात प्रश्न येतो कि, मला हे जमेल का? लोक काय म्हणतील? मी विसरलो तर? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनातच चालू होतो. हे लक्षण आत्मविश्वास कमी असण्याची आहेत. त्यामुळे पहिले आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम स्वतः मध्ये इतरांविषयी, समोरच्या लोकांबद्दल आपुलकीची भावना विकसित करायला शिका. आता तुम्ही म्हणाल कि याचा भाषणाची काय संबंध आहे? तर तसे नाहीए. हे बघा! माणूस आपल्या लोकांसमोर म्हणजेच आई, वडील, भाऊ, मित्र यांच्यासमोर बोलायला घाबरतो का? नाही ना! कारण त्यांच्यासमोर बोलायचं आपल्याला आत्मविश्वास असतो. माणूस तेव्हाच बोलायला घाबरतो जेव्हा तो इतरांसमोर असतो. जर तुम्हाला समोरचे आपलेच वाटले तर तुम्ही सरळ भाषण देऊ शकाल. आत्मविश्वास असल्यास आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात.

२. भाषणासाठी विषय/ मुद्दे कसे निवडावे?

भाषणे देण्यासाठी आपल्याकडे ज्ञान आणि संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा कोणत्याही विषयावर भाषण करायचे असल्यास त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. सखोल विषय ज्ञान असल्याशिवाय भाषण करणे म्हणजे जगाला आपले अज्ञान दाखवणे होय. आपले ज्ञान हाच आपला आरसा असतो. भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी अभ्यास तर कराच पण माहिती पण गोळा करा. त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करा. आणि सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे माहिती ही विश्वासू ठिकाणावरून घ्यावी म्हणजे माहिती खरी असणे महत्वाचे आहे. वादग्रस्त मुद्दे आपण कटाक्षाने टाळले पाहिजेत. तटस्थ राहून भाषण करता आले पाहिजे.
जर एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार असाल तर असा विषय निवडा जो तुम्हाला ज्ञात आहे तसेच त्या निवडलेल्या भाषणाच्या विषयावर आपल्याला दृष्टिकोन आणि मुद्दे परीक्षकांना व प्रेक्षकांना समजावून सांगता आले पाहिजे. शक्यतो प्रेक्षकांना आवडतील तसेच त्यांना ज्ञान असलेल्या विषयावर भाषण केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो.

३. श्रोत्यांबद्दल माहिती :

श्रोते म्हणजे ऐकणारे प्रेक्षक तसेच यामध्ये परीक्षक देखील येतात. भाषण ऐकणारे कोण आहेत हे आपण ओळखले पाहिजे. वरील मुद्यात सांगितल्या प्रमाणे श्रोत्यांची बौद्धिक पातळीप्रमाणे त्यांच्यासमोर विषय मांडायचा असतो. तुमचा अभ्यास कितीही असला तरी समोरच्या श्रोत्यांची ते ग्रहण करण्याची क्षमता आहे का हेही पाहणे तितकेच गरजेचे असते नाहीतर त्यांच्या डोक्यावरून पाणी जाईल. समजा समोर लहान मुले बसली आहेत तर त्यांना राजकारणाचे धडे देत असाल तर ते त्यांना समजणार कसे? असे समोर तरुणाई बसली असेल तर त्यांना अध्यात्मिक गोष्टीत रस वाटणे अवघड नाही का? श्रोत्यांना आवड असली तर ते मनापासून तुमचे भाषण ऐकतील. त्यातील माहिती ग्रहण करतील. त्यामुळे आपले श्रोते कोण आहेत, त्यांची गरज काय आहे हे वक्त्याला समजणे गरजेचे आहे .

मराठी भाषण करतेवेळी कोणती काळजी घ्यावी

४. विषय सादरीकरण :

कोणताही विषय श्रोत्यांसमोर मांडताना सुरुवात खूप महत्वाची असते. विषयाची प्रस्तावना, विषयाचा गाभा, उद्दिष्ट, समारोप या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तुम्ही सरळ मुद्दा बोलू शकत नाही कारण जर असे केले तर श्रोत्यांना ते कंटाळवाणे वाटू शकते. जवळ जवळ वक्त्यांच्या मनात भाषणाची सुरुवात हे भीती असते. चांगली सुरुवात करण्यासाठी काय करावे? सुरुवातीला काय बोलू? चारोळी सांगू कि हेच वक्त्याला समजत नाही. भाषणाची सुरुवात करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ते आपण बघूया.

१. पारंपरिक सुरुवात – मुख्यत्वे प्रत्येक वक्ता यानेच सुरुवात करतो. यात मुख्यत्वे अध्यक्षस्थानी जे आहेत त्यांचे नाव सर्वप्रथम, प्रमुख पाहुणे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नवे आणि शेवटी श्रोते, बंधू भगिनी, मित्र आणि मैत्रिणींनो अशी सुरुवात केली जाते.

२. प्रसंग सांगून सुरुवात- कोणताही प्रसंग सांगून सुरुवात करता येते. प्रसंग तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहेत त्याच्याशी संबंधित असायला हवा. अशा वेळी क्षणार्धात श्रोत्यांचे लक्ष वेधले जाते. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो जसे कि विनोद, सुखदुःख, मस्ती, आनंद इ. प्रसंग भाषणाच्या वेळेवर अवलंबून असावा. थोडक्यात सांगता येण्यासारखा प्रसंग निवडावा जेणेकरून थोडक्यात पण नेमकी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचेल.

३. चारोळी, म्हण, कविता, सुविचार याने सुरुवात – विषयाशी निगडित म्हण किंवा चारोळी असणे आवश्यक आहे. यामुळे समोरच्या माणसाला भाषणाचा मुद्दा थोडक्यात समजावता येतो. तसेच छोट्या संदेशातून प्रेरणाही मिळते.

४. विनोद सांगून भाषणाची सुरुवात- सुरुवातीलाच तुम्ही श्रोत्यांना हसवले तर श्रोत्यांनी भाषणाला सहमती दर्शवली असे म्हणता येते. तेथून पुढे भाषणावर चांगली पकड राहते. विनोद सांगण्याची सवय असावी. छोट्या छोट्या विनोदांचा अभ्यास करा. अधूनमधून गंभीर विषय झाल्यानंतर थोडी शैली बदला आणि श्रोते गंभीरपणा विसरून खळखळून हसायला लागतील.

५. भाषणाचे पाठांतर :

भाषणाचे पाठांतर असणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपल्याला आपल्या श्रोत्यांशी संवाद सादत किंवा नजरेला नजर देऊन भाषण करायचे असल्यास आपल्याला भाषणातील मुद्दे पाठ असावे लागतात. एखाद्या पानावरील अगोदरच लिहून आणलेले भाषण ऐकण्यास रुची येत नाही.
उदाहरण बघायचे असल्यास आपण आपले माजी पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग आणि सध्याचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी याचे घेऊ शकतो. श्री. मनमोहन सिंग जी शक्यतो अगोदर लिहून आणलेले भाषण सादर करायचे पण श्री. नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत हे फारसे दिसून येत नाही. त्यामुळे श्रोत्यांमध्ये आपला संदेश योग्य रित्या जातो तसेच ऐकणाऱ्यास कंटाळा देखील येत नाही. जर मुद्दे कठीण असतील किंवा भाषांकर्त्याला मुद्दे मांडण्यास अडथळे येत असतील किंवा पक्के पाठ नसेल तर बघून आपले मुद्दे देखील मांडू शकता.

Marathi Speech Tips

६. विशिष्ट भाषाशैली :

भाषाशैलीचा विचार करताना आपल्यासमोर कोणत्या भागातील लोक आहेत हे हि पहिले पाहिजे. जर शहरातील असतील सुशिक्षित असतील तर भाषा त्या प्रकारचीच असावी. जर आपल्यासमोर खेड्यातील लोक असतील तर गावरान भाषेत बोलावे म्हणजे त्यांना वक्ता आपल्यातीलच एक वाटतो व भावना सरळ जाऊन मनाला भिडतात. भाषेत ओढ असते ती ओढ आपल्या बोलण्यात असली पाहिजे. सरळ आणि सोपी भाषा वापरावी. उगाचच नको तिथे इतर भाषांचा वापर करू नये.
भाषण करताना महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे भाषण पूर्ण नकारात्मक नसावे. आपण नाकारात्मकतेने भाषण केले तर समोरच्या माणसाला ते ऊर्जा देणारे नाही ठरू शकणार त्याचप्रमाणे अति साकारात्मकही नसावे. दोन्ही मध्ये योग्य मध्य साधलेला असावा. आपल्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्या बोलण्यातून इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपला भाषण आपला ठसा उमटवून जात. आपल्यात जे नाही, ते उगाचच छाप पाडण्यासाठी करू नये.
उदा. भाषणात विनोद करणे सर्वांना जमत नाही, त्यामुळे विनोद करणे काही वेळेस फुस्स होऊ शकते किंवा भाषणात मोठ्यांचे ‘कोट’ वापरणे सर्वांना जमेलच असे नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे बोलावे . प्रत्येकाची बोलण्याची एक ढब असते. कोणी आवेशात बोलत, तर कोणी शांतपणे. आपापल्या मूळ शैलीला अनुसरून बोलावं उगाच कोणाची कॉपी करू नये. वक्त्याचे शब्दोच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत. उच्चरला जाणारा प्रत्येक शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चरला गेला म्हणजे श्रोत्यांना तो नीट कळतो

७. भाषण रंगवणे :

तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतील तर भाषण रंगते. श्लोक, दोहा, म्हणी, वाक्प्रचार, ओव्या, शायरी, कवितेच्या ओवी वक्त्याने योग्य वेळी व योग्य संदर्भ देताना मांडले ते श्रोत्यांची टाळी पडल्यावाचून राहणार नाही. तसेच भाषण करताना हातवारे करणे, हावभाव करणे, श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरे मागवणे यामुळे ऐकणारे कंटाळा करत नाहीत. ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही स्पर्धेच्या दिवशी भाषण कराल त्यादिवशी जर एकाच जागी उभे राहून बोलायचे असेल तर दोन पायांमध्ये योग्य अंतर ठेवा. स्टेजच्या वापर करण्याची संधी असेल तेव्हा स्टेजच्या वापर करा. एकाच ठिकाणी उभे असल्यास दोन्ही पायांवर समान भार द्यावा. आवाजात चढ उतार असावा. चेहऱ्यावर हावभाव असणे आवश्यक आहे तसेच देहबोली चा योग्य वापर करावा. आपली नजर सर्वांवर फिरवावी फक्त एकटक पाहू नये.
तुमच्या भाषणामध्ये चारोळ्या, , कथा, प्रसंग, माहितीचे वर्णन, दाखले, कविता, आकडेवारी, इ. विषयानुसार आवश्यक तो मसाला असावा. आपण जे बोलणार आहोत ते श्रोत्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले पाहिजे, कोणत्याही भाषणाचे अथवा व्याख्यानाचे हे अंतिम उद्दिष्ट असते. म्हणून भाषण करताना मोकळ्या जागेकडे अथवा आकाशाकडे तुमची नजर लावू नका. समोरील श्रोत्यांकडे पाहत त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवत ठासून बोला. वरील सर्व गोष्टींचा वापर केल्यास स्पर्धेच विजेते तुम्हीच झालात म्हणून समजा.

८. भारदस्त/दमदार आवाज :

वक्त्यांचा आवाज हि त्याला मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. पूर्वी ज्या वेळी ध्वनिक्षेपकासारखी साधने नव्हती तेव्हा वक्त्यांचा आवाज दणदणीत असावा अशी अपेक्षा केली जायची. आवाजात चढउतार महत्वाचा असतो. काही महत्वाची माहिती देताना किंवा महत्वाची वाक्ये बोलताना त्यावर भर देणे गरजेचे असते. म्हणजे श्रोत्यांच्या लक्षात येते कि हे वाक्य महत्वाचे आहे आणि ते त्यांच्या लक्षात राहते.

९. प्रसंगावधान राखणे :

हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. जसे पाऊस आल्यास लोकांना मैदान न सोडण्यासाठी भावनिक आवाहन करणे, चालू सभेत काही कारणाने गोंधळ झाल्यास श्रोत्यांना शांतता राखण्यास सांगून पुन्हा आपल्या विषयाकडे एकाग्र करणे, सहवक्त्यांशी जवळीक वाढण्यासाठी त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या सूत्रांचे आपल्या भाषणात कौतुक करणे, आयोजकांच्या चांगल्या सूत्रांचे कौतुक करणे, अशा प्रकारे प्रसंगावधान ठेवून आपण मोठमोठ्या प्रतिकूल प्रसंगांवर मात तर करूच शकतो; पण योग्य वेळी योग्य सूत्र मांडून अनेकांशी जवळीकही साधू शकतो. तसेच पत्रकार परिषदेसारख्या ठिकाणी प्रसंगावधान ठेवल्यास आपली भूमिका नेमक्या वेळेत आणि स्पष्टपणे मांडू शकतो.

१०. भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे :

कोणत्याही गोष्टींमध्ये वेळेला जितके महत्व असते तितकेच महत्व भाषणामध्येही महत्वाचे आहे. भाषण उगाचच ताणलेले नसावे. त्यात मुद्देसूद आणि टप्प्याटप्प्याने माहिती असावी. जेणेकरून श्रोत्याला भाषण रटाळ वाटणार नाही. मोजक्या वेळात मोजकी आणि महत्वाची तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करायचा. श्रोत्यांच्या लक्षात राहील असे काही प्रसंग थोडक्यात सांगायचे. भाषणाचा वेळ शब्दसाठा वाढवल्याने वाढतो. माणसाच्या शब्दात जर सौजन्य असेल तर त्याची साऱ्या जगासोबत मैत्री होऊ शकते. शब्दाला धार तर हवीच पण आधारही असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेवढे तुमच्या शब्दांचे वजन वाढवलं, शब्द साथ वाढवलं तेवढे भाषण प्रभावी आणि जास्ती वेळ रंजकपणे चालेल. वक्ते कधीकधी भाषणात शब्दांच्या आणि मुद्द्यांच्या गुंत्यात इतके गुरफटून जातात कि त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन जाते. निर्धारित वेळ टाळून गेलेली असते. समारोप करायचा राहून जातो. म्हणून एकाच भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्याचं मोह टाळून शेवटच्या मिनिटात समारोपाकडे यावे आणि भाषणाचा शेवट करावा.

मराठी भाषण टिप्स
आपल्याला भाषणासाठी किती वेळ दिलेला आहे त्यानुसार भाषण तयार करणे योग्य असते.

११. समारोप / भाषणाचा शेवट कसा करावा?

कोणत्याही गोष्टींमध्ये वेळेला जितके महत्व असते तितकेच महत्व भाषणामध्येही महत्वाचे आहे. भाषण उगाचच ताणलेले नसावे. त्यात मुद्देसूद भाषणाची सुरुवात जशी महत्वाची असते तसाच शेवटही महत्वाचा असतो. भाषणाचा समारोप म्हणजे निष्कर्ष काढणे. संपूर्ण भाषणाचा गाभा हा समारोपात सामावलेला असतो. तुम्ही या भाषणातून काय घेऊ शकता किंवा काय घेतले पाहिजे हे समारोपातून बोलायचे असते. शेवटी सर्वांचे आभार मानून आपल्या भाषणाची नम्रपणे सांगता करायची. समारोप करतानाही चारोळी,शायरी,सुविचार वगैरेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. शेवट करताना ज्यांनी तुम्हाला बोलायची संधी दिली त्यांचे आणि ज्यांनी तुम्हाला शांतपणे ऐकून घेतला त्यांचेही आभार मानायला विसरायचे नाही. हा उपक्रम पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन देऊन सावकाशपणे आपल्या जागेवर बसावे.

व्यासपीठावर टाळायच्या गोष्टी:

मराठी भाषण कसे करावे? याच सोबत काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या व्यासपीठावर उभे असताना टाळणे गरजेचे असते. जसे कि,

१. नाकाला, चेहऱ्याला कोठेही वारंवार हाताने खाऊ नये. किंवा केसांना पुन्हा पुन्हा सावरू नये.
२. पाय सारखे हलवू नये किंवा कोणत्याही एकाच पायावर उभे राहू नये. उभे राहताना दोन्ही पायावर सामान भर टाकून उभे राहावे. पाठीचा पोक न काढता ताठ उभे राहून बोलावे म्हणजे आत्मविश्वास वाढतो.
३. शक्यतो बूट वापरावेत, त्याची लेस व्यवस्थित बांधलेली असावी परंतु जर चप्पल घटली असे तर त्याच्याशी सारखे पायाने खेलत बसू नये.
४. रुमालाचा अति वापर टाळावा. शर्टच्या बटणांची खेळणे, चष्म्याची कधी घाल करणे, या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात
५. भाषण लिहिलेला कागद किंवा त्यांच्या नोंदी उघडून पाहणे. हातातील पेन खाली पडून शोधणे अशा अनावश्यक कृती टाळाव्यात.

आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त करून देणारा एक महत्वाचा पैलू म्हणजे वक्तृत्व होय. वक्तृत्वाने व्यक्तमत्वाची ओळख फार लवकर होते. म्हणूनच जनसंपर्कासाठी वक्तृत्वासारखे माध्यम नाही. प्रा. अत्रे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, प्रबोधनकार ठाकरे, छ. शिवाजीराजे भोसले इ. तर राजकीय क्षेत्रात अटलबिहारी वाजपेयी, राजीव दीक्षित, प्रमोद महाजन तसेच अविनाश धर्माधिकारी, विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी, यासारखे वक्त्यांची भाषणे सतत ऐकावी आणि सराव करावा. बोलण्याची पद्धती, दिलेली उदाहरणे, प्रश्नांना उत्तरे हे सर्व टिपून ठेवा आणि त्याचा अभ्यास करा. याप्रमाणे प्रत्येक भाषण देणाऱ्या वक्त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे वक्त्यासाठी आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल याचा विचार करावा. “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” हि उक्ती लक्षात घेऊन प्रयत्न करावा. भाषण हि कला आहे आणि कष्ट केल्याशिवाय आत्मसात होणार नाही.

आशा करतो तुम्हाला मराठी भाषण कसे करावे? हि पोस्ट तुम्हाला तुमच्या पुढील भाषणांसाठी नक्कीच उपयोगी पडेल. जर आपल्याला एखाद्या विषयावर लेख किंवा मराठी निबंध, भाषण हवे असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

याचसोबत खालील निबंध आणि भाषणे वाचण्यास विसरू नका. तसेच भाषण आवडल्यास शेयर करायला अजिबात विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

3.3/5 - (10 votes)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

9 thoughts on “मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

  1. मला वरिल वाचनातून खुप काही नवीन गोष्टी कळाल्या. खुप छान पोस्ट आहे.

  2. खुप छान सर भाषण कसे करावे या लेखामुळे एक प्रोत्साहन मिळाले धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *