15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सम्पूर्ण भारतात विविध कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी शाळांना सुट्टी जरी असली तर शिक्षक आपल्याला या दिनानिमित्त निबंध किंवा भाषणे प्रस्तुत करायला सांगतात. या साठी मी या पोस्टमध्ये स्वातंत्र्य दिन विशेष मराठी निबंध प्रस्तुत करीत आहे जर आपल्याला भाषणे हवी असतील यात आमच्या मराठी भाषणे या भागाला भेट नक्की द्या. सदर निबंध दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिला आहे. एक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य वीरांनी कसे कष्ट केले हा एका भागात लिहिला आहे तर दुसऱ्या भागात सध्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (Indian Independence Day) कसा साजरा केला जातो हे लिहिले आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 August Marathi Essay ( निबंध नं. १)

Independence Day Essay in Marathi

15 August Marathi Essay

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..

15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. खूप हालअपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण पाहत आहोत. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते.

इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ठेवले होते. त्यांचे स्वसंरक्षणाचे हक्क काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी १८५७ चा उठाव केला पण त्यामुळेही इंग्रजांच्या नितीमध्ये काही फरक पडला नाही परंतु या उठावामुळे राष्ट्रभक्तीची भावना भारतीयांच्या मनात तीव्र झाली. बऱ्याच ठिकाणी मोठे उठाव झाले. ते इंग्रजांनी सैन्यबळाचा वापर करून दडपून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले. १८५७ उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले त्यामुळे इंग्रजांनी त्यांची व्यवस्था आणखीनच शिस्तीची करत फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला व हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडणे चालू केले.
दीडशे वर्ष आपण अनंत हालअपेष्टा सहन केल्या. तेवढ्या काळात आमचा इतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुणांना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकऱ्यांना यांनी खूप लुबाडले. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, स्वतःच्या चहाच्या माल्यांची भरभराट व्हावी म्हणून भारतीयांना चहाचे व्यसन लावले. निळीचे उत्पादन करण्याची सक्ती केली. भारतातील कच्चा माल स्वस्तात विकत घेऊन स्वतःच्या देशातील पक्का, यंत्रावर बनवलेला माल चढ्या किमतीमध्ये भारतामध्ये विकला त्यामुळे देशी कारागीर हवालदिल झाले. त्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले. अनेक जण जमिनीवर कर्जे घेऊन कर्जबाजारी झाली. कित्येकांनी जमिनी विकल्या. अशा प्रकारे इंग्रजांनी ऐन दुष्काळाच्या वेळीही काही उपायोजना केली नाही. भारतीयांचे ब्रिटिशांनी खूप हाल केले.
इंग्रजांचा हा धुर्तपणा काहींनी ओळखला होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध शास्त्र उभारले त्यामध्ये तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, नाना साहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. क्रांतिकारक होते. त्यांनी आपला निषेध शास्त्रांद्वारे नोंदविला. काहींनी इंग्रजांची हत्या केली तर काही लोकजागृती करत लोकांच्या मनात स्वातंत्र्यविषयी तीव्र भावना जागी केली. रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी लेखणी हातात घेतली. त्यांनी वाणीचा आणि लेखणीचा वापर करून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय जनतेला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी या लोकांनी प्रेरणा , जाणीव करून दिली. ‘ स्वातंत्र्य हि काही भीक मागून मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी इंग्रज सरकारला जाब विचारला पाहिजे’ अशा प्रकारे क्रांतिकारकांनी तरुणांना प्रेरणा दिली. “बंदिवानही भारतमाता आज फोडीते टाहो, मातेच्या स्वातंत्र्याला घरदार सोडूनि याहो” अशा प्रकारे आव्हान करून सर्वांना या लढ्यात क्रांतिकारक सामावून घेत होते.

टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वदेशी, स्वावलंबन, असहकार या मार्गानेही इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचे आवाहन केले. सरकारी जुलमीकायदे, अन्याय, नोकऱ्या, दडपशाही या विरुद्ध सत्याग्रहाची मोहीम गांधीजींनी सुरु केली. गांधीजींना या कमी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ. अनेक नेत्यांनी सहकार्य केले. सुभाषचंद्र भोस यांनी इंग्रजांच्या विरोधात ‘आझाद हिंद सेना’ उभारली.


१५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळाले खरे पण या स्वातंत्र्याला गालबोट लागले ते फाळणीचे. भारताचे दोन तुकडे झाले. एक हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान. मुस्लिम लीग च्या मागणीमुळे भारताची फाळणी झाली. त्यावेळी खूप ठिकाणी हिंसाचार झाला. त्यातूनही आपला भारत देश सावरला आणि पुढे जात राहिला. आणि जगाला शांतीचा संदेश देतच राहिला. देशाला सावरण्यासाठी नेतेमंडळी झटत राहिली.
तुलसीदासजी म्हणतात, ‘पराधीन सपनेहू सुखानाही’ म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नातदेखील सुख नसते. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासियांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.
आपले हे सौभाग्याचं आहे की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या भारताला सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. आणि आपल्याला खरा स्वातंत्र्याचा अर्थ जगभर पसरवायचा आहे. शांतीचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी असेल प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसोबतच किंबहुना त्याहीपेक्षा जास्ती आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे आणि त्याचे पालन करणेही गरजेचे आहे, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. अनेक आव्हाने पेलायची आहेत आज स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना हि आव्हाने पेलण्याच्या जिद्दीला,एक समाज म्हणून आपल्या एकसंध प्रयत्नांना व लोकशाही मूल्यांना अधिक बळकट करण्याचा, त्यांना बळ देण्याचा निर्धार करूया.

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मनाचा मुजरा…

स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi Language (निबंध नं. २)

Independence Day Essay in Marathi

स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi Language

15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदे आपण बनवले. विविधतेत नटलेला भारत देश खूप जणांच्या बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाही. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले राष्ट्रपती माध्यमातून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये देशात काय काय सुधारणा झाल्या आणि इथूनपुढे काय करणार आहोत, कशाप्रकारे करणार आहोत या विषयी सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहन होते ते देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होते. त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन जन-गन -मन हे राष्ट्रगीत म्हणले जाते. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये राहून “झेंडा उंचा रहे हमारा” हे गीत सामुदायिकपणे म्हणायचे असते. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात. नवीन योजनांची घोषणा केली जाते. पंतप्रधान देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता करतात.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी दिल्लीमध्ये म्हणजेच आपल्या राष्ट्रीय राजधानीत तसेच सर्व देशांच्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये या ठिकाणे नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. आसमंत देशभक्तीपर गीतांनी आणि भाषणांनी भरून जातो. लहान मुलांची सकाळी प्रभात फेरी निघते. छोटी छोटी मुले पूर्ण गणवेशात शाळेत हजर असतात. लहान मुलांना हातात झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळीकडे झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. सैनिकांच्या संचालनाचे कार्यक्रमही पाहण्यासारखा असतो. तिन्ही दलाचे सैनिक त्यांच्या कवायती सादर करतात. ते पाहताना उर अभिमानाने भरून जातो. आणि त्यातून जे प्रोत्साहन मिळते ते काही वेगळेच असते. लहान मुलांनाही याचे खूप अप्रूप वाटते आणि तेही देशासाठी काहीतरी करायची स्वप्न पाहायला लागतात.
आपला तिरंगा आसमंतात फडकताना आपल्याला काही संदेश देतो असेच वाटते. वर केशरी, मध्ये पंधरा आणि खाली हिरवा तसेच मध्ये पांढरा रंग आपल्यात नवी ऊर्जा निर्माण करतो. केशरी रंग बलिदानाचे प्रतीक असतो. पांढरा रंग पवित्रतेचे संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी दाखवतो. मध्ये असणारे अशोक चक्र विकासाचे प्रतिक दर्शवतो.


स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक मान्यवर व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतात.देशातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस असतो. सारा देश हे कौतुक आपल्या दूरदर्शन वर पाहत असतो. बऱ्याच लोकांना दिल्ली ला जाऊन हा कार्यक्रम साजरा करणे प्रत्यक्षात शक्य होत नसल्याने दूरदर्शनच्या माध्यमातून हा कार्यक्रम दाखवण्याची उत्तम सोय केलेली असते. हे पाहताना त्या व्यक्तींविषयी आदर अजून वाढतो आणि अभिमानही वाढतो. कितीही कठीण परिस्थिती असूदेत सगळीकडे अंधकार असला तरी अशाही परिस्थितीत अनेक सामन्यातून असामान्य असलेल्या व्यक्ती पुढे येतात हे आमचे वैशिष्ट्य आहे. हि माणसेच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत. आणि त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.
सर्व नागरिकांमध्ये राष्टाविषयी प्रेम आणि अभिमान जागृत करण्यासाठी तसेच सर्वांमध्ये एकीची भावना प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन हा दिवस साजरा करायलाच हवा. एकी आणि देशाभिमान यांच्या जोरावर आपण आपल्या देशापुढील अनेक प्रश्न समाधानकारकरित्या सोडवू शकतो. स्वातंत्र्य दिन हा असा दिवस आहे कि जो सर्व धर्म-पंथ-भाषेच्या नागरिकांना जोडतो. या सगळ्यामुळे झालेला भेद मिटविण्याचे सामर्थ्य या दिवसात आहे. त्यामुळे जो देश “ विविधतेमध्ये एकटा” चा अभिमान धरतो त्या भारतासारख्या देशाला हा दिवस फार महत्वाचा आहे व त्यामुळेच तो दरवर्षी आनंदाने आणि अभिमानाने साजरा होणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी देशासाठी केलेल्या त्याग, बलिदानाची जण आहे व ती लक्षात ठेवून आपण आपल्या पूर्वपिढ्यानी आयुष्य वेचत मिळविलेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास सक्षम आहोत व आमच्याकडे आता कुणी तिरकस नजरेने बघू नये हे जगास दाखवायला तरी आपण हा विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे.

घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंचच उंच
जय हिंद जय भारत या जयघोषाने
गर्जु दे सारा आसमंत !

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

5/5 - (2 votes)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

One thought on “15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *