गुढीपाडवा वर मराठी माहिती आणि निबंध

गुढीपाडवा वर मराठी माहिती आणि निबंध

गुढीपाडवा हा हिंदू प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. मराठी हिंदूंमध्ये तसेच इतर बहुतांश हिंदू समाजामध्ये हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये हा सण मोठ्याने साजरा केला जातो. या पोस्ट मध्ये ढीपाडवा वर मराठी भाषेत माहिती पाहूया तसेच एक निबंध देखील लिहीत आहे.

गुढीपाडवा सणाबद्दल मराठीमध्ये माहिती

गुढीपाडवा हा सण मराठी तसेच हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातात. चैत्र महिन्यात येणार हा सण हिंदू नववर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जातो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा तसेच आजूबाजूच्या इतरही राज्यात साजरा केला जातो. पाडवा हा शब्द संस्कृत प्रतिपदा या शब्दांवरून घेतलेला आहे, प्रतिपदा या शब्दाचा अर्थ वर्षातील पहिला दिवस असा होतो. ह्या सणामागे इतिहास देखील सांगितला जातो तसेच याचा संबंध पौराणिक कथेशी देखील जोडला जातो. या दिवस हिंदू देवता ब्रम्हाने विश्वाची निर्मिती केली आहे असे अनेक कथेमध्ये सांगितले आहे. तसेच काही लोकांच्यामते याच दिवशी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला होता.

गुढीपाडवा वर मराठी निबंध (Essay on Gudipadwa in Marathi)

गुढीपाडवा-Gudipadwa-Essay-in-Marathi

सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना याचे जेव्हा आगमन होते तेव्हा येतो गुढीपाडवा ; हिंदू धर्मियांच्या नववर्षाला याच दिवशी प्रारंभ होतो. आनंद प्रित्यर्थ गुढी उभारून हा सण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेशमध्येही साजरा केला जातो , परंतु याचे विशेष आकर्षण महाराष्ट्रातच आहे.


ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे आपल्या हिंदू धर्माच्या पुराणात सांगितले आहे, त्यामुळे अख्ख्या विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्यादिवशी साजरा होतो असे म्हणल्यास वावगे वाटायला नको. गुढीपाडव्या विषयी बऱ्याच आख्यायिका प्रचलित आहेत. गुढीपाडव्याला “वर्षप्रतिपदा” असेही म्हणतात. हा दिवस पुण्यकाळासारखा असतो म्हणून या दिवशी नवीन कामाचा शुभारंभ केला जातो. प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकाळ अयोध्या वासियांनी गुढ्या उभारून श्री रामाचे स्वागत केले होते. पुराणानुसार गुढीपाडव्याच्या आणखी एक कथा आहे. या कथेमध्ये शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे बनवले होते. असे म्हटले जाते; की या मातीच्या पुतळ्यात प्राण फुंकून त्याने शकांचा पराभव केला व तेव्हापासून शालिवाहन राजाच्या नावाने “शालिवाहन शक” ही नवीन कालगणना सुरू झाली. अजून एक आख्यायिका प्रचलित आहे ती म्हणजे वसू नावाच्या राजाबद्दल ती अशी कि, वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो .
तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड’ अथवा ‘काठी’ असा होतो, तसाच तो ‘तोरण’ असाही होतो. या दिवशी सकाळी लवकर उठून , अंघोळ करून, गुढी उभारायची असते. पूर्वी गुढी उभारण्यासाठी चांदीचा कलश व जरी वस्त्र वापरले जात होते. आताही फार काही फरक नाही. आजसुद्धा तीच प्रथा आज फक्त आता वस्त्राच्या ऐवजी भगवा झेंडा काठीला बांधतात. काही ठिकाणी सद्य बांधतात, रंग भगवा असतो असेही काही, लोक आपल्या पसंतीनुसार वस्त्र निवडतात. त्या नवीन वस्त्रांवर झेंडूची, चाफ्याची अशी नानाविध फुले लावतात. त्यानंतर साखर पाकाची माळ किंवा त्याला काही ठिकाणी गाठी असा शब्द प्रचलित आहे. त्यानंतर गुढीला कडुलिंबाची डहाळी व तांब्याचे भांडे किंवा लोटा लावला जातो व गुढी तुळशीवृंदावनाच्या बाजूला जाते. गुढीच्या अवतीभोवती पाट ठेवून रांगोळी काढतात, त्यानंतर तिची मनोभावे पूजा करून तिला हळदी कुंकू वाहतात, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. सहसा महाराष्ट्रामध्ये या दिवशी पुरणपोळी विशेष महत्वाची असते. . गुढीपाडव्याचा प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या कोवळ्या पानात हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गुल, घालून हे मिश्रण सर्वांना वाटले जाते.सर्वजण हा प्रसाद खातात. सूर्यास्तापूर्वी पूजा करून अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.

गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत काळानुसार बदलत गेली आहे. गुढीपाडव्याला २००० सालापासून सकाळी ठिकठिकाणी मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक पोशाखात स्त्री-पुरुष स्वागतयात्रेत सहभागी होतात. त्याशिवाय समाजप्रबोधन करणारे चित्ररथ साकारले जातात. मिरवणुकींमध्ये लेझीम, ढोल, झांज, कीर्तन अशा विविध पथकांचा समावेश केला जातो. सोबत लाठीकाठी, दांडपट्टा आणि भाला फिरवणे अशी प्रात्यक्षिके दाखवली जातात. ज्या मार्गावरून स्वागतयात्रा जाणार असतात, तेथील चौकाचौकात भव्य रांगोळ्या आणि उंच गुढ्या उभारल्या जातात. अशा मिरवणूक, चित्ररथ आणि शोभायात्रांसाठी गिरगाव-ठाणे-डोंबिवली यांसारखी मुंबईजवळील ठिकाणे प्रसिद्ध आहेत. ते लोण सर्वत्र; विशेषतः जिल्हाशाहरांत पसरत आहे.


महाराष्ट्राबाहेर विखुरलेली मराठी मंडळी त्यांच्या राहत्या घरी गुढीपाडवा साजरा करतात. दिल्लीत काही लाख मराठीजन आहेत. त्यामुळे तेथे अनेक ठिकाणी गुढीपाडव्याचा उत्सव दिसून येतो. जनकपुरी येथील दत्तविनायक मंदिरात सकाळी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. मंदिरावरील ध्वज दरवर्षी गुढीपाडव्याला बदलला जातो. गुढीपाडवा पश्चिम दिल्लीतील आनंदवन मराठी सहनिवास, चौगुले दिव्यालाय, मध्य दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदन अशा अनेक ठिकाणी साजरा होतो. इंदूर संस्थानाला देवी अहिल्याबाईंसारख्या धर्मपरायण व कुशल प्रशासकीय गुण असलेल्या महिलेचे नेतृत्व लाभल्यामुळे तेथे मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलली आणि फळली. त्यामुळे तेथे महाराष्ट्रातील सणवार श्रद्धेने आणि दणक्यात साजरे करण्याची परंपरा आहे.

गुढीपाडवा हा सण होळकर राजघराण्यातही विधिपूर्वक साजरा केला जाई. त्या घराण्याच्या वंशजांमार्फत तो साजरा होत असतो. पूर्वी होळकर राजे किंवा त्याच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधींद्वारे व राजपुरोहितांमार्फत त्या परंपरेची पूर्तता होत असते. नव्या पिढीने त्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आज. जुन्या राजवाड्यासमोरील उद्यानात व इतरत्रही नव्या वस्त्रालंकाराने सजलेले स्त्री-पुरुष सूर्योदयाच्या वेळी सूर्याला सामूहिक अर्घ्यदान करून नव्या वर्षाचे स्वागत करतात. त्या सोहळ्यात मराठी भाषिकांबरोबर स्थानिक हिंदी भाषिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात. तो सोहळा प्रेक्षणीय असतो. ‘सानंद न्यास’ संस्थेच्या वतीने प्रातःकालीन संगीत सभेच्या माध्यमातून सुमधुर संगीत लहरींनी नव्या ऋतूला सामोरे जाण्यासाठी शरीर बलवान करण्याची तयारी या दृष्टीने मानला जातो.


गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घोड्याचे दान करावे असा संकेत रूढ आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व्हावा हा त्यामागील हेतू. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेल्या तो सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक सांगतात . सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार, गुढीपाड्व्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षणाच्यामुळे भूमी सुफलित होते. कृषी संस्कृतीत त्याला विशेष महत्व आहे. आधीच्या हंगामातील पीक हाती येऊन आलेली समृद्धी साजरी सहन असाही आशय त्यामागे आहे. लोकगीतातील –
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती उजवी दही दिशा ||
गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ ।।
गुडी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ||
अशा ओव्या सानेगुरुजींनी नोंदून ठेवल्या आहेत. संत साहित्यातही गुढीचा उल्लेख सापडतो.
माझ्या जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी |
येथे गुढी म्हणजे भगवी पताका असा पूर्णतः अभिप्रेत आहे. हिंदू धर्माचे व भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याला भगवी पताकाही फडकवण्याचा प्रघात काही ठिकाणी दिसून येतो.
तो दिवस ‘उगादी’ नावाने कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, केरळ, तामिळनाडू या दक्षिणी राज्यांमध्ये साजरा केला जातो. ‘युग आदि’ म्हणजे ‘युगाचा प्रारंभ’. दक्षिण भारतात कैरीचा पचडी नावाचा पदार्थ त्या दिवशी केवळ जातो. गोड,तिखट,आंबट,तुरट अशा सर्व चवींची मिश्रण त्यामध्ये असते.

गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्व आहे. चैत्र महिना हा मराठी महिना जेव्हा येतो तेव्हा हिवाळ्याच्या थंडीचा उद्रेक कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. वसंत ऋतूचे आगमन होते. हवेतील गारवा कमी झालेला असतो पण उन्हाळाही तीव्र नसतो. या सुमारास झाडाला नवी पालवी फुटते. शुष्क झालेली सृष्टी चैत्राच्या नवपालवीने अगदी फुलून जाते. निसर्गातील या परिवर्तनाचा , नवचैतन्याचे स्वागत करण्याचा उद्देशाने गुढी उभारली जाते.


गुढीपाडव्याला काही धार्मिक विधी पार पडले जातात. त्यात ब्रह्मपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. गुढीला धर्मशास्त्रात “ब्रह्मध्वज” असे म्हणतात. ‘ब्रह्म’ हि भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात श्रेष्ठ कल्पना आहे. ‘ब्रह्म’ हा शब्द ‘बृह’ म्हणजे वाढणे, मोठे होणे या धातूवरून बनला आहे . जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात ‘वाढणे’ या क्रियेचे सर्व अर्थ सामावले आहेत ते ‘ब्रह्मा’ आहेत . गुढीचे पूजन म्हणजे ब्रहमध्वजाचे पूजन. पूजन करताना “ब्रह्मध्वजाय नमः” अर्थात

ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिनसंवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु ||
हा मंत्र म्हणतात.
गुढीला कडुलिंबाची डहाळी का लावतात हे माहिती असणे गरजेचे आहे. पुराणातील कथेप्रमाणे- समुद्रमंथनातून वर आलेला अमृतकुंभ मिळविण्यासाठी देव आणि दंवात झटपट झाली. त्या झटापटीत अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले त्यातून हे कडुलिंबाचे रोप तयार झाले. कडुलिंबाच्या ब्रह्मदेवाचे प्रतीक मानतात. कडुलिंबाच्या हवा शुद्ध होते व ते एक प्रकारे कीटकनाशकही आहे. कडुलिंबाचे आणखीही बरेच उपयोग आहेत जसे कि, याच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडू असणारी हि वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाचे आहेत. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने ‘नीम अ ट्री फॉर सोलविंग ग्लोबल प्रॉब्लेम्स’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यावरूनच कडुलिंबाचे महत्व विशद होते.


गुढीपाडव्याला पंचांग पूजन व वाचन करतात. त्या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात. चैत्र महिन्यात रोज सकाळी अंगणात एक चौकोन सारवून त्यावर विशिष्ट प्रकारची रांगोळी म्हणजेच ‘चैत्रांगण’ काढतात. चैत्रांगणाला हळदकुंकू व फुले वाहतात. देवीचे वासंतिक नवरात्र व श्रीरामाचे नवरात्रही गुढीपाडव्यापासून सुरु करतात, तो कुळाचाराचा भाग मानला जातो. या काळात पंचांगाची सुरुवात होते.
भारतीय संस्कृती निसर्गाच्या हातात हात घालून जाते. मानवाच्या दैनंदिन जीवनशैलीचा ती भाग होते आणि सणाची व उत्सवाची खुमारी वाढवते. संस्कृत साहित्याने त्या सर्व सणउत्सवांना धार्मिक आयाम जोडत त्यांच्याविषयी भारतीय मनात श्रद्धा व आस्था निर्माण केली आहे. एकुणातच, नव्या वर्षाच्या स्वागताचा आल्हाद मनामनात रुजवणारा गुढीपाडवा वसंताच्या चाहुलीत मानवी मनाला दिलासा देतो यात शंका नाही !

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

SwaRani

लिहण्याचा माझा छंद, जसा फुलातील मकरंद, लेखणीतून माझ्या उतरवते शब्दसुगंध !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *