पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

1) पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

Essay on Rainy Season in Marathi

मानवी जीवन सृष्टीच्या निर्मात्याने तीन ऋतूंमध्ये बनवले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. या तीनही ऋतूंचे आपले असे काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक ऋतू निसर्ग, पशु, पक्षी, मानव यांच्या जीवनावर आपली छाप वेगवेगळ्या पद्धतीने सोडतो. त्यात पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा. सर्वजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाचा दाह सहन करून पावसाच्या सरीमध्ये चिंब व्हायला कोणाला आवडणार नाही. त्यातच मातीचा सुगंध मनाला आनंद देऊन जातो. हवेत गारवा पसरलेला मनाला थंडावा देऊन जातो. पावसाळा प्रत्येकाला विश्रांती देतो. पावसाच्या सरींमुळे हवामान प्रसन्न होते. आकाश राखाडी आणि कला रंगाच्या ढगांनी भरलेले असते. या ढगांच्या दरम्यान सूर्य झाकलेला असतो किंवा अदृश्य होतो. विजेसह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतो. पाऊस हिरवळ वाढवतो . झाडे आणि गावात हिरवे आणि सुंदर दिसतात. रंगीबेरंगी फुले सर्वत्र उमलतात.
पावसाळ्यापूर्वी जंगलातील वातावरणात अनोखे बदल होत असतात. पशुपक्ष्यांची अस्वस्थता, त्यांच्या हालचालीवरून येणाऱ्या पावसाच्या अंदाजाचे, तसेच दुष्काळाचे मिळणारे संकेत आदिवासी अत्यंत हुशारीने काढतात. चातक पक्षी पावसाळा जवळ आल्याचे संकेत देतो त्याप्रमाणेच पावशा पक्षीही पूर्वसंकेत देतो. हे पक्षी ओरडायला शेतकऱ्यांना मशागतीची करायची चाहूल लागते. कडक उन्हामुळे सर्व झाडे आणि गावात सुकते, तसेच पाण्याचे कोरडे पडतात, त्यामुळे जनावरांना खायला मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते. परंतु पावसाळा आला कि पुन्हा पाणी व अन्नाची कमतरता दूर होते, म्हणून पावसाळा जनावरांसाठी अमृत देण्यासारखे कार्य करते.
लहान मुलांमध्ये पावसाचे वेड खूपच असते. “येरे येरे पावसा, तुला देतो पैसा” अशी गाणी चालू होतात. कागदाच्या होड्या करून “माझी सुरेख नाव माझी छान छान नाव” अशी गाणी म्हणतच नाव पाण्यात सोडतात . डबक्यात खेळायला लहान मुलांना खूप आवडते . पावसात भिजण्यासाठी मग आईला लाडीगोडी लावायची सुरुवात होते. मग आईचा डोळा चुकवून काढता पाय घ्यायचा आणि मनसोक्त पावसात भिजायचं नंतर आहेच मग आईचा ओरडा. पावसात इंद्रधनुष्य बघायला मुलांना खूप आवडतो तो खूप सुरेख दिसतो. सात रंगानी आकाश हे आकर्षक आणि रंगीबेरंगी दिसते. पावसाळ्यात काहींना तर भज्जी खायची हौस होते आणि लहानांप्रमाणे मोठ्यांनाही भज्जीची चाहूल लागते. लहानमुलांना शाळेत जाण्यासाठी घरचे नवीन रेनकोट घेऊन देतात. पावसाबद्दल बोलताना छत्री हा आपल्या आपुलकीचा विषय असतो. रेनकोट असतानाही छत्री घेऊन शाळेत जाण्याची मजाच न्यारी असते. पण छत्रीने दप्तर तर भिजणार नाही ना याची काळजी असतेच. रंगीबेरंगी छत्र्या बाजारात आलेल्या असतात. कधीकधी पावसाचे पाणी इतके साठते कि शाळेला सुट्टी मिळते. मग काय मज्जाच !
सर्व ऋतूमध्ये पावसाळा आश्चर्यकारक ऋतू आहे. मान्सून या नावानेही पावसाळ्यास ओळखले जाते. पावसाळा साधारणतः तीन ते चार महिने भारतात राहतो. आपल्यासारख्या कृषिप्रधान म्हणजे ज्यांची अर्थव्यवस्था शेतीवर जास्त अवलंबून आहे, अशा देशात पाऊस महत्वपूर्ण भूमिका बजावतो. पिकाची गुणवत्ता पावसाच्या गुणवत्तेशी थेट प्रमाणात असल्याने पाऊस वेळेवर यावा यासाठी शेतकरी आतुरतेने प्रार्थना करतात. भूजल पातळी तसेच नद्या, समुद्र, तलाव यासारख्या जलसंचयातील पाण्याची पातळी राखण्यासाठी पावसाळा हा महत्वाचा ऋतू आहे.
पावसाळ्यात काही सण साजरे होतात. जुलै महिन्यात एकीकडे पावसाळा सुरुवात होते तर दुसरीकडे अनेक उत्सवाचे रंग चढू लागतात. भारतातील अनेक सण आणि उत्सव हे निसर्गाशी निगडित असल्याने, देशात मान्सूनच्या काळात अनेक उत्सव साजरे होतात. पंढरपूर ची वारी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, १५ ऑगस्ट, बकरी ईद, बेंदूर, नागपंचमी इत्यादी. हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. गारवा असल्याने आल्हाददायक आहार घेण्याकडे सर्वांचा कल असतो. वातावरण थंड असल्याने गरम किंवा उष्ण पदार्थ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. पावसाळा आणि चहा याचेही नाते घट्ट आहे. आलं घालून केलेला वाफाळलेला चहा सर्वांना आवडतो. या काळात बाहेर टपऱ्यांवर चहासाठी गर्दी पाहायला मिळते.
पावसाळा हा कविता करणाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. बालकवी, बा.भ.बोरकर यांच्या मराठीतील कविता अजरामर आहेत.
बा.भ.बोरकर लिहितात, ‘ गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले.’ पावसाळ्यामध्ये एक उसळता उत्साह व चैतन्य साऱ्या माणसामध्ये भरून जातो. “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।।” असे यथार्थ वर्णन बालकवींनी आपल्या कवितेत केले आहे.
माणसाची मरगळलेली उमेद त्याला पुन्हा प्राप्त देतो.सृष्टीत नवे चैतन्य पसरते, पिके बहरतात.अशा तर्हेने वर्षा ऋतू हा जीवनदायी ऋतू आहे. आनंद आणि सौंदर्य यांचा एक मिलाफ या ऋतूत आपल्याला अनुभवायला मिळतो.
पाऊस हा सर्वांचा आवडता विषय. म्हणजे शाळेत असताना आपण सर्वांनी ‘ माझा आवडता ऋतू पावसाळा’ हा निबंध लिहिलाच असेल. आपल्याकडे बहुतकरून शाळा- महाविद्यालय पावसाळ्यातच सुरु होतात. शाळेला दांडी मारणारी अथवा महाविद्यालय मधील लेक्चर बंक करणारी मुलं असो किंवा पाऊस बराच पडला कि बॉस ला काहीही थापा मारून सुट्टी टाकणारी मोठी माणसं असो, सगळ्यांचा अनुभव वेगळा असतो. मग दांडी मारून कुठेतरी पावसाळी सुट्टी घालवण्याचा मोह बऱ्याच जणांना आवरत नाही. वेगवेगळ्या रूपात पाऊस आपल्याला भेटत असतो. एकूणच काय ‘ श्रावणमासी हर्ष मानसी’ असे आल्हादायक वातावरण निर्माण करणारा पाऊस लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा हवा हवासा वाटतो.

2) पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

Essay on Rainy Season in Marathi

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

पाऊस कौतुकास्पद असला तरी कधी कधी मात्र अख्खे शहर ठप्प करून जातो याचा अनुभव आलाच असेल. काही वेळेस हा पाऊस अख्ख्या महानगरांची झोप अक्षरशः उडवून जातो. खूप जनजीवन विस्कळीत करणारा पाऊस कधी कधी कौतुकाचा असतो यावर विश्वासच बसेनासा होतो. एक तडाख्यात संपूर्ण महानगराची पार महादैना करून जातो. मग तो नकोसा होऊन जातो. बऱ्याच ठिकाणी पावसाने हाहाकार माजवल्याची दृश्ये आपण टीव्ही वर पाहतो. लोकांची कशी दशा होते हे पाहून हृदय पिळवटून निघते. खूप उलथापालथ होऊन बसते ज्यातून सावरून निघणं अशक्यप्राय वाटत. काही ठिकाणी थोड्याथोडक्या पावसानेही गुढगाभर पाणी साचते. रस्त्यावरच्या वाहतुकीवर ही याचा परिणाम होतो. पावसाळ्यात रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते हे समजत नाही त्यातून मार्ग काढणे म्हणजे महादिव्य करावे लागते.
काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी , घरे यावर दरड कोसळण्याची भीती दर्शवली जाते; जसे कि पुण्यातील माळीण गावातील डोंगर कोसळून संपूर्ण गावच गाडले गेले होते. किती लोकांचे नुकसान झाले. काही लोकांचे प्राण गेले. विजेच्या तारांचा अटक लागून मृत्यू होण्याच्या घटनाही काही नवीन नाहीत. रस्त्यावरील विजेच्या तारा लोंबकलत पाण्यात पडून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला विजेचा झटका लागून मृत्य होण्याची दाट शक्यता असते. उभी पिकेही पावसाने वाहून जाण्याची भीती असते. जोरदार पावसाने काही वेळेस पिकांचे अतोनात नुकसान होते तेव्हा शेतकरी हवालदिल होतो. खरे ते तो पाऊस पडायची आतुरतेने वाट पाहतो पण काही वेळेस तोच पाऊस त्याचा घात करेल हे त्यालाच अनपेक्षित असते,
भारतात जनजीवनाचे दोन प्रकार येतात ते म्हणजे ग्रामीण आणि शहरी .या दोन्ही ठिकाणी अतिपावसाचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. ग्रामीण भागात सोयी तशा कमी प्रमाणात असतात, गरजेपुरत्या आवश्यक गोष्टी गावकरी करून घेतात. जसे कि घराची छप्पर, भिंती, गुरांचे गोठे नीट करून घेतात. शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतो पण पुढच्या गोष्टी पावसावर अवलंबून असतात.

अतिवृष्टी झाली तर नदीनाल्यांना पूर येतात, दळणवळणाची साधने, गावात येण्यारे मार्गही बंद होऊन जातात. गरजेच्या वस्तू मिळेनाशा होतात. वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण होते. नदीकाठची घरे वाहून जातात. शेती जलमय होतात. कित्येक शाळांची छते गळतात मग मुलांना शाळेत जाते कठीण होते.
शहरी भागात रस्त्यातील खड्डे अगदी पावसाच्या पाण्याने खचाखच भरतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात होतात. गाडी कुठून काढावी समजत नाही. गटारांचे, नाल्यांचे सांडपाणी, जागोजागी साठलेला कचरा सर्व रस्त्यावर येऊन पडते. जिकडेतिकडे घाण, दुर्गंधी, अस्वच्छता असते. त्यामुळे रोगराई पसरते. दूरध्वनी सेवा खंडित होते. वाहतूक सेवा विस्कळीत होते. वीजपुरवठाही बंद होतो. कधीकधी उंच इमारतीही तग धरू शकत नाहीत. गाड्या पाण्याखाली बुडतात, भिंती उन्मळून पडतात इतके रौद्र रूप पाऊस धारण करतो.
पावसाचे उत्साहात स्वागत आणि त्यावर राग धरत आपण पावसाचा आनंद घेत असलो तरी काही ठिकाणी म्हणजेच पश्चिम आणि मराठवाड्यात हा पाऊस दरवर्षी रुसलेला असतो . धरणे, नद्या, नाले तहानलेलेच असतात. गावातील लोकांना मेलो मैल जाऊन पाणी आणावे लागते. शेतीलाही पाणी नसते. त्यामुळे पिके नष्ट होतात आणि पर्यायाने शेतकरी आत्महत्या करतात. गुरे पाण्यावाचून मारतात. लोकांना आपली गावे सोडून दुसऱ्या गावी स्थलांतर करावे लागते परिणामी गावेच्या गावे ओस पडतात.
पावसात घडणाऱ्या दुर्घटनांना केवळ प्रशासन, किंवा शासनाला जबाबदार धरून चालणार नाही तर आपण सामान्य माणसे सुद्धा त्याच पद्धतीने जबाबदार आहोत. प्लास्टिक च्या पिशव्यांवर बंदी असूनही आपण त्या अजूनही वापरत आहोत, कुठेही कचरा टाकला जातो , झाडे तोडतो, काही ठिकाणी पाणी साचून राहते तिथे मच्छर, माश्या होतात. त्याने रोगराई पसरते. त्यामुळे आपणही काही सुधारणा करणे गरजेचे आहे.
कधी बरसला रिमझिम
तर कधी मुसळधार
पाऊसच तो मनमौजी
खट्याळ, लहरी फार

पाऊस मात्र आपल्या लहरीपणाच्या तालात असतो. मनमौजी केव्हा रिमझिम बरसतो तर कधी धो धो कोसळतो. कधी डोळे आभाळाला लागतात , जीव टांगणीला लागतो तरी येत नाही . कधी कधी देवाला साकडे घालावे लागते पाऊस जाण्यासाठी इतका येतो. येतोही आपल्याच मर्जीने आणि जातोही आपल्याच मर्जीने . पावसावर कोणाचेही अंकुश नाही.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

1.2/5 - (10 votes)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *