होळी निबंध मराठी Best Essay on Holi in Marathi

होळी निबंध मराठी Best Essay on Holi in Marathi

होळी निबंध मराठी मध्ये (Essay on Holi in Marathi) लिहिण्याची खूप इच्छा होती. तशा विनंत्या देखील अनेक आल्या होत्या. याचाच विचार करून या पोस्ट मध्ये होळी निबंध मराठी मध्ये Holi Nibandh in Marathi प्रस्तुत करत आहे. होळी निबंध चालू करण्यापूर्वी मी सांगू इच्छित आहे कि काही लोकांचा उत्तर भारतीयांची होली आणि होळी मध्ये थोडा गोंधळ होतो. उत्तरभारतीयांच्या होळी ला मराठीत आपण रंगपंचमी म्हणतो. जर तुम्ही रंगपंचमी वरील निबंधाच्या शोधात असाल तर तो देखील पाहू शकता.

होळी निबंध मराठी (Essay on Holi in Marathi/ Holi Nibandh in Marathi)

होळी निबंध मराठी | Essay on Holi in Marathi | Holi Nibandh in Marathi
होळी निबंध मराठी | Essay on Holi in Marathi | Holi Nibandh in Marathi

होळी सण विविध रंगाचा,
हर्ष आणि स्नेहाचा,
रंगाच्या आनंदात न्हाऊन निघूया!

होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतात उत्साहाने साजरा होणार रंगाचा एक सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. काही ठिकाणी तो एकत्रितरित्या साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी थंडी ओसरायला सुरुवात झालेली असायची. वसंत ऋतूच्या आगमनाचा तो काळ असतो. रानातील विविध वृक्ष वेलींना कवी केशवसुत यांच्या ‘जुने जाऊद्या मरणालागून’ या काव्यपंक्तींप्रमाणे पानगळती होऊन नवीन पाळावी आलेली असायची कोवळ्या पालवीने शिवार एखाद्या नववधूप्रमाणे नटलेले असायचे. रानात पळसाची आणि काटशेवरी ची लालभडक फुले फुललेली असायची.

होळीच्या या काळात बहुतांश शेतकऱ्यांचा गहू, हरभरा व इतर रब्बी पिके घरात यायला सुरुवात झाली असते. शेतकऱ्यांना शेतातील कामांपासून थोडा निवांतपणा मिळण्याचा काळ हा असतो. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात.

होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. बरेच जण वाळलेल्या हरभऱ्याचा डहाळी नैवेद्य म्हणून ठेवत आणि होळीच्या दिवशी मग त्या विस्तवावर भाजण्यासाठी आणत. दर होळीला नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे. अशा वेळी येणार हा महत्वाचा सण.. तसेच होळी पूर्वी येणार आठवडी बाजार हा महत्वाचा. कारण याच बाजारात नवीन नवीन खाद्यवस्तू विकायला येतात. नवीन धान्य घरात येते. बाजार सारा नवीन गोष्टींनी भरून जातो.
होळीचा सण संपूर्ण भारतवर्षात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. मोठ्या धुमधडाक्यात हा सण साजरा होतो. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत. शहरातील लोकांपासून गावातील लोकांपर्यंत.

सुशिक्षित लोकांपासून आदिवासी लोकांपर्यंत सगळ्यांसाठी होळीचा जल्लोष अगदी सारखाच असतो आणि तेवढाच उत्साहाचा असतो तसेच त्यामागच्या परंपराही वेगवेगळ्या असतात. उत्तर भारत या सणांचा घरेलू मैदान. विविध प्रांतांमध्ये या सणाला वेगवेगळी नावे आहेत जसे कि, ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी’ , ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘फाग’, ‘फागुन’, ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात ‘शिमगो’ म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला ‘फाल्गुनोत्सव’, आणि दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त ‘वसंतागमनोत्सव’ किंवा ‘वसंतोत्सव’ असेही म्हणण्यात येते. “देशीनाममाला” या ग्रंथात हेमचंद्र यांनी याला ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चरत जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. होळी नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो ज्याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासले जाते. अर्थात हि प्रथा काही ठिकाणी बंद झाली आहे. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

बाकीच्या राज्यातही खूप उत्साहात हा सण साजरा केला जातो जसे की, पश्चिम बंगाल मध्ये वैष्णव संप्रदायात “गौर पौर्णिमा” नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्री कृष्ण जन्माष्टमी प्रमाणे भक्तीभावाने साजरा केला जातो. ईशान्य भारतामध्ये विशेषकरून मणिपूर मधील विष्णुपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात. राजस्थान मध्ये एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात. राजस्थानात संस्थान म्हणून पाण्यात असताना तत्कालीन रीतीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.

आदिवासी जमातींमध्ये हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या ढोल वाजवून, नृत्य करून स्त्री-पुरुष उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरी करत असताना आदिवासी भोजनामध्ये गोड पुरी, मासळी आणि गोड भट या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून हि परंपरा सुरु असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात आणि विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते. उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्व विशेष आहे. येतील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतातील खेडेगावात होळीचे महत्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटवली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्निवरून चला जाण्याची प्रथा आहे.

हा सण पार पुरातन काळापासून आपल्या देशात साजरा केला जात असावा. भगवान कृष्ण आणि होळी यांचा संबंध अनेक साहित्यातून, गीतांमधून दिसतो. त्यावरूनच “आज गोकुळात रंग खेळतो हरी” “अगं नाच नाच नाच राधे, उडवुया रंग” यासारखे मराठी आणि अनेक हिंदी गाणीही असतात आणि ती लोकप्रिय आहेत. होळी बद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत जसे कि, लहान मुलांना पीडा देणाऱ्या “ होलिका”, “ढुंढा”, “पुतना” यांसारख्या राक्षसांच्या दहनाच्या कथांमध्ये या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिका देवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता कि तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका आहे.

होळी निबंध मराठी । Holi Essay in Marathi | Essay on Holi in Marathi | Holi Nibandh in Marathi
होळी निबंध मराठी | Essay on Holi in Marathi | Holi Nibandh in Marathi

रानात फुललेल्या लालभडक आणि काटशेवरी च्या फुलांनी होळीच्या आगमनाची वर्दी अगोदर दिलेली असायची. होळी पंधरा-वीस दिवस राहिली म्हणजे गावातील मुली-महिला या होळीसाठी शेणापासून विविध आकाराच्या गोवऱ्या तयार करायला लागतात . गोल, त्रिकोणी, चौकोनी आकाराच्या गोवऱ्यांच्या माळा होळीपूर्वी तयार झालेल्या असतात . तो बनवण्याच्या उत्साह घरोघरी दिसतो. दुसरीकडे मुलं सुद्धा होळी जवळ अली की आनंदात असतात . दहा-बारा दिवस अगोदर, फुललेल्या पळसाची आणि काटशेवरीची फुले रानातून आणतात . ते त्यापासून रंग बनवायचे व बाटल्यांमध्ये भरून ठेवायचे. होळीपर्यंत रंगाने भरलेल्या बाटल्यांची संख्या हळू हळू वाढत जाते.

होळीच्या दिवशी चार- पाच वाजले म्हणजे गावाचा गावगाडा असलेली व्यक्ती गावात चक्कर मारून आणि महिलांनी बनवलेल्या गोवऱ्या जमा करत व गावाच्या मारुतीच्या मंदिरासमोर आणत . लहान लहान मुलांच्या साहाय्याने मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या गोठ्यावरून गोवऱ्या, थोडी फार लाकडं जमा करायची आणि मध्ये एक एरंडाची काडी रोवली की मावळत्या सूर्याच्या साक्षीने होळी पेटवायची. मग दर्शनासाठी हळू हळू सर्व गाव मंदिरासमोर जमा व्हायचा. गाव एकत्र आलेल्या पाहून खूप छान वाटते.

सायंकाळच्या वेळी गावातील स्त्रिया होळीमध्ये पुरण पोळीचा प्रसाद अर्पण करत. त्याभोवती पाणी टाकत गोल फेरी मारतात. त्यानंतर मुले घोळका करून होळीभोवती बोंबा मारतात. गावात एकाच आवाज घुमायला लागतो .आसमंतात एकाच आवाज असायचा. होळीच्या दिवशी आकाश हे पौर्णिमेच्या पांढऱ्याशुभ्र चंद्रप्रकाशाने सजलेले असते. आणि खाली होळीच्या प्रकाशात संपूर्ण गावातील माणसं,मुलं, महिला त्या मंदिराच्या प्रांगणात सणाच्या उत्साहात नाहतात.

नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करत असतात. काटखेळ, डेरा नृत्य, गौरी नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुष मंडळींनी स्त्री वेष धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यात सादर केले जातात. ढोल-तशाच युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सनापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून हि नृत्ये सादर केली जातात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाई. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.

होळी पडलेला तो पुराण-पोळीचा प्रसाद खाल्ला व दर्शन घेतले म्हणजे आपल्यातील सर्व दुःख , आजार जळून जातात आणि आपण निरोगी होतो, हा तो समज. समज यासाठी म्हणाले की जीवनाच्या होळीमध्ये जोपर्यंत आपण आपल्यामधील काम, क्रोध, लोभ, मत्सर हे जळणार नाही तोपर्यंत होळी हि आपल्याला निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देऊ शकणार नाही. आपल्यातील वाईटाची होळी केल्याशिवाय चांगुलपणाचा प्रसाद मिळणार नाही हे नक्की. आपण आपल्यातील सगळ्या दोषांची होळी करणे हे आपले ध्येय असावे. होळीत काय जाळलं आणि का जाळलं याविषयी तुकोबाराय सांगतात की,

दैन्य दुःख आम्हां न येती जवळी।
दहन हे होळी होती दोष ।।
याचा अर्थ असा की, लोकं होळीत शेणाच्या गोवऱ्या,लाकूड जाळतात. त्याभोवती बोंबा मारतात. “मी होळीत माझ्यातील दोष जाळून टाकले आणि दोष जाण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही.” होळीत झाडे तोडून वनराई नष्ट करण्यापेक्षा हा उपाय बरा नाही का? सारेजण एकत्र येऊन एक संकल्प करूया नवीन विचारांना आपल्या मनात स्थान देऊया , हीच शिकवण तर प्रत्येक सण आपल्याला देत असतो.
अशी साजरी करू होळी
संकल्प करू नवं विचारांचे,
संस्कृती एकात्मता जपुया
विविधरंगी होळी अनुभवुया!

आशा आहे कि तुम्हाला हा होळी निबंध मराठी मध्ये (Holi Nibandh in Marathi) आवडला असेल. ह्या होळी निबंध मराठीत बद्दल आपले अभिप्राय खाली कमेंट मध्ये जरूर कळवा. तसेच खालील इतर विषयांवरील निबंध वाचायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)

१०. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

इतर

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *